---Advertisement---
नवी दिल्ली : भारत-गंगेय मैदानी प्रदेशाचा उत्तरी भाग, पूर्व किनारपट्टीवरील राज्ये, गुजरात आणि महाराष्ट्र ही पश्चिम भारतातील राज्ये आणि त्यांना लागून असलेल्या भागांमध्ये या वर्षीच्या उष्णतेच्या लाटांचे दिवस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त राहतील, असे भारतीय हवामान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
हवामानशास्त्रीय दृष्ट्या संवेदनशील असे प्रदेश आहेत, जिथे उष्णतेची लाट न येणाऱ्या भागांमध्येही तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. हवामानाच्या दृष्टीने काही विशिष्ट प्रदेश असे आहेत जे अशा परिस्थितीस अधिक प्रवण असतात. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास वर्षाच्या या काळात विदर्भातील सरासरी तापमा ४१ ते ४२ अंश सेल्सिअस असते. त्याचप्रमाणे, उत्तरप्रदेश आणि हरयाणा या राज्यांमध्येही मे महिन्याच्या सुमारास तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे अशा उच्च तापमानाच्या दिवसांसाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, असे मृत्युंजय मोहपात्रा यांनी पुढे नमूद केले. संवेदनशील लोकसंख्येला मदत करण्यासाठी भारतीय हवामान विभाग कोणती पावले उचलत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, रस्त्यावरील विक्रेते आणि शेतात काम करणारे मजूर यासारख्या बाहेर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये माहिती प्रसारित करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याव्यतिरिक्त, उष्णतेची लाट आणि त्या वेळी करावयाच्या अपेक्षित उपाययोजनांची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत.
सर्वांपर्यंत पोहोचणे आणि भारतीय हवामान विभागाद्वारे तयार करण्यात आलेली हवामानाचा अंदाजविषयक माहिती उपलब्ध करून देणे हे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही सरकारी माध्यमांद्वारे माहिती पुरवतो. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ‘कॉमन अलर्ट प्रोटोकॉल’चा समावेश आहे आणि यामुळे मोबाईल फोन असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही माहिती मिळवणे शक्य होते, असे मोहपात्रा म्हणाले.
उष्णतेच्या लाटेचा अंदाज आधीच
तापमानातील वार्षिक आणि दैनंदिन बदलांचा सामना करण्यासाठी आयएमडी उष्णतेच्या लाटेचा अंदाज एक ऋतू आधीच उपलब्ध करून देते. त्यानंतर पुढील चार आठवड्यांसाठी वैध असलेला विस्तारित श्रेणीचा अंदाज दर गुरुवारी जारी केला जातो. उन्हाळ्याच्या महिन्यांत जिल्हा स्तरावर दररोज सात दिवसांचा इशाराही दिला जातो, असे मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.









