---Advertisement---
एरंडोल येथील नगरपालिकेचा अनेक वर्षापासून बंद असलेला भोंगा (सायरन) (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ‘डिजीटल डिटोक्स’ संकल्पनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आला असून दररोज – सायंकाळी सहा व रात्री आठ अशा दोन वेळा हा भोंगा वाजतो. एरंडोल शहरात सत्तरच्या दशकात नगरपालिकेतर्फे दररोज पहाटे पाच, दुपारी बारा व रात्री साडेआठला भोंगा (सायरन) नियमितपणे वाजवला जात होता. त्यामुळे नागरिकांना वेळ समजत होती. याशिवाय अंजनी नदीला येणारा
महापूर, घर अथवा अन्य ठिकाणी लागलेली आग यासारख्या दुर्घटना घडल्यास पालिकेतर्फे भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले जात होते. मात्र, अनेक वर्षांपासून पालिकेतर्फे वाजवण्यात येणारा भोंगा बंद करण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. हा भोंगा पुन्हा सुरु करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी पदभार स्विकारल्यानंतर भोंगा पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात दखल घेतली. तशा सूचना देखील त्यांनी पालिका प्रशासनाला केल्या. त्यानुसार, १७ मार्चला झालेल्या पालिकेच्या सभेत नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, मुख्याधिकारी अमोल बागूल, शिवसेनेचे गटनेते प्रा. मनोज पाटील, नगरसेवक अमोल तंबोली, छाया दाभाडे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी या जुन्या आठवर्णीना उजाळा देणाऱ्या विषयांवर
चर्चा केली. त्यानुसार, १४ एप्रिलपासून भोंगा पूर्ववत वाजवण्याचे नियोजन करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली.
दररोज सायंकाळी सहाला भोंगा वाजल्यानंतर नागरिकांनी विशेषतः विद्याथ्यर्थ्यांनी दोन तास मोबाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन यापासून दूर राहून या दोन तासात मैदानी खेळासह विविध पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी केले आहे. पालिकेच्या कर्मवीर अभ्यासिकेत असलेल्या विविध स्पर्धा पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेतर्फे १७ मार्चला झालेल्या सभेत विविध ४८ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेतर्फे पुन्हा भोंगा सुरु करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.









