छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर अजिंठा घाटात पाच तास ट्रॅफिक जाम, नागरिकांसह वऱ्हाड घाटात अडकलं…!

---Advertisement---

 

छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात दोन ट्रक अचानक बंद पडल्याने मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा एमएच 12 ZE 1884 क्रमांकाचा ट्रक घाटातील अरुंद रस्त्यावर इंजिन बंद पडल्याने थांबला. त्यानंतर विटा घेऊन जाणारा एमएच 43 U 6514 हा दुसरा ट्रकही घाटात बंद पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.

घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी भरत कोळी आणि प्रदीप बेदरकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र घाटातील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी आल्या.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन ट्रॅक्टरच्या मदतीने विटांनी भरलेला ट्रक बाजूला काढून मोकळ्या जागेत हलवला. तसेच दुसऱ्या ट्रकसाठी अजिंठा येथून मेकॅनिक बोलावून दुरुस्ती करण्यात आली.

मात्र, या ट्रॅफिक जाममध्ये डोंगरगावहून धनवट येथे लग्नासाठी निघालेला नवरदेव आणि वऱ्हाड सुमारे दोन तास अडकून पडले. मंगळवारी मोठ्या प्रमाणात लग्न मुहूर्त असल्याने अनेक वऱ्हाड मंडळी या घाटात अडकली होती. काही वाहनचालकांनी सोयगाव-हळदा पर्यायी मार्गाचा वापर केला.

अजिंठा घाटात ट्रॅफिक जाम झाल्यास चार ते पाच तासांपर्यंत वाहतूक विस्कळीत होते, त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---