---Advertisement---
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी आता परप्रांतीय दादागिरीला लगाम बसणार आहे. प्रवाशांशी होणारा भाषिक संघर्ष टाळण्यासाठी आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी राज्य सरकारने एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे.
यापुढे रिक्षा-टॅक्सीचा परवाना हवा असेल, तर चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे कायद्याने अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये ऐतिहासिक बदल प्रस्तावित करून परप्रांतीय चालकांसाठी मराठी भाषेचा स्पीड ब्रेकर लावला आहे.
आता परिवहन विभागाने नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला आहे. यानुसार, परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला चालकाचे चारित्र्य पडताळणी करण्यासोबतच, त्याला मराठी भाषेचे ज्ञान आहे का, हे तपासण्याचे अधिकार मिळणार आहेत.
केवळ काम चलाऊ मराठी चालणार नाही, तर प्रवाशांच्या सूचना समजून घेण्याइतपत मराठीचे ज्ञान असणे आता अनिवार्य असेल. केवळ नवीन परवानाच नव्हे, तर मीटर असलेल्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळीही ही भाषिक चाचणी घेतली जाणार आहे.









