अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी; लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा

---Advertisement---

 

अमळनेर : येथील संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडी संस्थानतर्फे उत्सवाच्या तयारीसंदर्भातील माहिती देण्यात आली. खानदेशातील शेवटची यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवासाठी तयारी सुरू असून परिसरातील व्यावसायिक ठिकाणी दालनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान पारंपरिक कार्यक्रमांसोबत काही नव्या उपक्रमांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यात्रेतील दिंड्यांच्या व्यवस्थेसाठी नियोजन करण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नगरपालिकेचे तसेच वाडी संस्थानचे कर्मचारी समन्वयाने कार्यरत राहणार आहेत. यात्रेदरम्यान चार ते पाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रात्रीपर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमानंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. यात्रेत कीर्तन, प्रवचन, अन्नदान आदी कार्यक्रमांमध्ये भाविकांचा सहभाग अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले.

यंदा यात्रेत ४० ते ५० लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होण्याची शक्यता असून स्थापनादिनाच्या दिवशी सुमारे दीड लाख भाविक उपस्थित राहतील, तर पाच दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविक भेट देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. हवामान अनुकूल राहिल्यास व पाणीपुरवठा सुरळीत राहिल्यास यात्रेला अधिक प्रतिसाद मिळेल, असेही सांगण्यात आले.

यावर्षी निवडून आलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका विविध कामांमध्ये सहकार्य करत असून प्रशासनातील सर्व विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

ही माहिती वाडी संस्थान येथे आयोजित पत्रकार परिषदेत परमपूज्य प्रसाद महाराज यांनी दिली.

  • संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगर परिषदेकडून विविध पायाभूत कामांना गती देण्यात आली आहे. यात्रा परिसरात चार टॉवर उभारून हायमास्ट दिवे भाड्याने घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या कामासाठी महिनाभरासाठी सुमारे २ ते ३ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची बाब नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर भाड्याने दिवे घेण्याऐवजी नगर परिषदेकडूनच हायमास्ट लाईट्स खरेदी करून बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
  • हे चार टॉवर पार्किंग परिसर, मीना बाजार तसेच यात्रा परिसराच्या मध्यभागी उभारण्यात येणार आहेत. तसेच यात्रेतील रथ मार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी दोन दिवसांत ‘शिरपूर पॅटर्न’नुसार रस्ता तयार करण्यात आला आहे.
  • याशिवाय समाधी मंदिरासमोर मुरूम टाकून जागेचे समतलीकरण करण्यात आले असून, यात्रा परिसरात पाईपलाईन टाकून मोठ्या गटाराचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.
  • सदर कामे माजी आमदार शिरीष चौधरी तसेच नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.
    प्रशांत निकम (उपनगराध्यक्ष) नगरपरिषद,अमळनेर

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---