मुक्ताईनगरमध्ये भाजप संघटन बळकटीसाठी नंदकिशोर महाजन यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, सरपंच परिषदेकडून मागणी

---Advertisement---

 

मुंबई / जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वातील रिक्तता भरून काढण्यासाठी येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर भागवत महाजन यांना उमेदवारी देण्याची मागणी सरपंच परिषदेने केली आहे.

या संदर्भात सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ आणि रावेर तालुका अध्यक्ष अमोल सुरेश पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मुक्ताईनगर हा मतदारसंघ दीर्घकाळ भाजपचा मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या धोरणानुसार हा मतदारसंघ सहयोगी पक्षाकडे गेल्यामुळे भाजपचा थेट आमदार नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम आणि अनुभवी नेत्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

नंदकिशोर महाजन यांनी पक्ष संघटन उभारणी आणि निवडणूक व्यवस्थापनात केलेले काम उल्लेखनीय असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दोनदा प्रमुख म्हणून काम पाहिले असून बूथ स्तरावरील नियोजन, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद आणि संघटित पद्धतीने केलेल्या कामामुळे पक्षाला चांगले यश मिळाले. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयातही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे प्रस्थापितांना पराभूत करत यश मिळवले. याशिवाय अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांमध्ये पक्षाला विजय मिळवून दिला.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये राजकारणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

महाजन यांचा जळगाव जिल्ह्यातील सरपंचांशी असलेला संपर्क हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले. विविध विकासकामांबाबत मार्गदर्शन करणे, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, तसेच गावपातळीवरील प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून निधी उपलब्ध करून देणे या बाबतीत त्यांची भूमिका प्रभावी राहिली आहे. त्यामुळे सरपंचांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

महाजन यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्यास मुक्ताईनगरसह संपूर्ण जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यांना सक्षम मार्गदर्शक मिळेल, कामकाजाला वेग येईल आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल, असा विश्वास सरपंच परिषद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---