---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात बँडचे वाहन पुढे घेण्यावरून झालेल्या वादात एका ७१ वर्षीय वृद्धाला लोखंडी कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात १० संशयित आरोपींसह इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील वडती येथील नारायण सुका कोळी यांच्या घरासमोर २२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी बँडचे वाहन पुढे घेण्यावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी छगन यादव कोळी (वय ७१, रा. विरवाडा, ता. चोपडा) यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या साक्षीदारांना शिवीगाळ करत मारहाण केली. संशयित आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केलीच, पण एका आरोपीने आपल्या हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केली. फिर्यादी हे वयस्कर असून या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.









