---Advertisement---
मॉस्को : शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारत एक प्रबळ खेळाडू म्हणून उभा राहिला असून भविष्यात भारतीय शस्त्रे जागतिक
पातळीवर अनेक वर्षांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या देशांना मागे टाकणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. शस्त्रास्त्र बाजारपेठे भारताने मोठी झेप आपले स्थान बळकट केले आहे. २०२५ मध्ये भारताची संरक्षण निर्यात चार अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्याचे अहवालात नमूद आहे.
जागतिक शस्त्र बाजारपेठेत रशियापुढे भारताने मोठे आव्हान निर्माण केले असल्याचे अहवाल तयार करण्यात सहभागी असलेल्या प्रसिद्ध रशियन पत्रकार व्हॅसिली गोलोवनिन यांनी म्हटले आहे. २०२५ मध्ये भारताची संरक्षण निर्यात चार अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्ता हाती घेतली तेव्हाच्या तुलनेत ही निर्यात ५६ पटींनी जास्त आहे. हा आकडा थक्क करणारा आहे. भारताने २०२० नंतर जागतिक शस्त्र बाजारपेठांमध्ये आपली पकड निर्माण केली. आता भारताच्या एकूण शस्त्र निर्यातीत फिलिपाईन्सचा वाटा ४२ टक्के आहे. त्यानंतर आर्मेनिया (३२ टक्के) आणि व्हिएतनाम (११ टक्के) यांचा क्रमांक लागतो. यात त्यांनी
आर्मेनियाचा विशेष उल्लेख केला आहे. हा देश काही वर्षांपूर्वीपर्यंत रशियन शस्त्रास्त्रांवर अवलंबून होता. तथापि, तो आता भारतीय शस्त्रे खरेदी करू लागला आहे.
प्रमुख निर्यातदार देश बनण्याच्या दिशेने वाटचाल
एकेकाळी रशिया हा अमेरिका आणि फ्रान्ससह जगातील सर्वाधिक शस्त्रे विकणारा देश होता. मात्र अनेक देशांनी आता भारतीय शस्त्रे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. भारताचा यासंदर्भातील वेग थक्क करणारा आहे, असेही गोलोवनिन यांनी म्हटले आहे. जपानी पत्रकार यासुओ ताकुची यांनीही याबाबतीत भारताने निर्माण केलेल्या दबदब्याबद्दल स्वतंत्र लेख लिहिला आहे. त्यांनी म्हटले की, भारत आता केवळ शस्त्रे खरेदी करणारा देश राहिला नसून, तो एक प्रमुख निर्यातदार देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.









