महापुरूषांच्या पुतळ्याभोवतीचा अतिक्रमणाचा मुद्दा तापला, स्थायी सभेत लढ्ढा, भंगाळे आक्रमक ; ‌‘दै. तरूण भारत‌’च्या वृत्ताचे पडसाद

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांभोवती असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच तापला. सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी आक्रमक होत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर उपायुक्त पंकज गोसावी यांनी पुतळ्यांभोवतीचे अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम आखून कारवाईचे आश्वासन दिले.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (4 एप्रिल) पार पडली. सभेला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त पंकज गोसावी, सहा. आयुक्त उदय पाटील, मुख्य लेखाधिकारी विजयकुमार सोनवणे, नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. ‌‘शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना अतिक्रमणाचा वेढा‌’ अशा मथळ्याखाली ‌‘दै. तरूण भारत‌’ने सोमवारी ठळक अक्षरात वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताचे पडसाद सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. स्थायी समिती सभेत चर्चेत सभागृह नेते नितीन लढ्ढा, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, दीपक सूर्यवंशी, इब्राहीम पटेल, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सभागृह नेते लढ्ढांनी मांडला मुद्दा

शहरातील अतिक्रमणासंदर्भात सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून महामार्गावर कारवाई होत आहे. परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुभाष चौकासह महापुरूषांच्या पुतळ्यांना अतिक्रमणाने वेढले आहे. अत्यंत भयंकर आणि विदारक दृश्य त्याठिकाणचे आहे. तसेच दर रविवारी नेहरू चौकात लागणाऱ्या कपडा मार्केटबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासन याबाबत कारवाई करेल का? आणि कारवाईमध्ये सातत्य राहिल का? असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला. त्यावर उपायुक्त पंकज गोसावी यांनी महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम आता पूर्ण होत आली आहे. ती झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही मंदिराजवळ अतिक्रमण – विष्णू भंगाळे

मंदिराभोवती असलेल्या अतिक्रमणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा प्रशासनाला फोनद्वारे सूचना केल्या. तरी देखील शहरातील जैन मंदिराभोवतीचे अतिक्रमण जैसे थेच असल्याचा मुद्दा शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचा फोन येऊनही कारवाई होत नसेल तर मग आम्ही आता आंदोलन करायचे का?तसेच सुटीच्या दिवशी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद राहत असल्याने सांगणार कुणाला? असा सवाल करीत प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सुटीच्या दिवशीही पथक कारवाई करणार
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कार्यालयीन दिवसांमध्येच अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाते. मात्र शनिवार आणि रविवार या दोन सुटीच्या दिवशी अतिक्रमणाची परीस्थिती पुन्हा जशीच्या तशी राहते. अ त्यामुळे सुटीच्या दिवशीही कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि विष्णू भंगाळे यांनी केली. त्यावर उपायुक्त गोसावी यांनी सुटीच्या दिवशी देखील अतिक्रमणाचे गस्ती पथक तैनात केले जातील असे आश्वासन दिले.

रिक्षा चालकांना शिस्त लावा

शहरात रिक्षा चालकांचे अधिकृत थांबे ठरलेले असतांना रिक्षा चालक मनमानी पध्दतीने रिक्षा रस्त्यावर लावतात. परिणामी नागरिकांना चालायला देखील रस्ता नसतो. काही रिक्षा चालकांची नोंदणी देखील झालेली नाही. गर्दीच्या ठिकाणी रिक्षा रस्त्यात राहत असल्याने अनेकदा वाद होतात. त्यामुळे या रिक्षा चालकांना शिस्त लावावी अशी मागणीही नितीन लढ्ढा यांनी केली.

नालेसफाई होणार तरी कधी ?

स्थायी समिती सभेत नितीन लढ्ढा आणि विष्णू भंगाळे यांनी नालेसफाईबाबत प्रश्न उपस्थित केला. पावसाळा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. तरी देखील आरोग्य विभागाकडून नालेसफाईचे नियोजन झाले नसल्याचे सभेत सांगण्यात आले. त्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी उदय पाटील यांनी नालेसफाईबाबतचा नियोजनाचा अहवाल बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. बांधकाम विभागाने येत्या दोन तीन दिवसात टेंडर काढून सफाईला सुरूवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शाळांकडून कराराचे उल्लंघन – अरविंद देशमुख

शहरातील महापालिकेच्या जागांवर सुरू असलेल्या शाळांचे करार संपुष्टात आले आहे. तरी देखील या शाळा त्या जागांवर प्रवेशाच्या नावाखाली पैसा गोळा करीत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केला. शहरातील सेंट जोसेफ, उज्वल स्कूल, विद्या इंग्लिश मीडिअम स्कूल या शाळांच्या जागांचे करार संपले आहेत. एकप्रकारे हे कराराचे उल्लंघन असल्याची बाब अरविंद देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच कचरा संकलनात मोठा घोळ होत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. त्यावर आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी बीव्हीजी कंपनीला आत्तापर्यंत एकूण 54 लाखांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सभागृहात दिली. तसेच सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी बील अदा करण्यापूर्वी स्थायी समितीची मंजूरी घ्यावी अशा सूचना प्रशासनाला केल्या.

इंधन भरणाऱ्या वाहनांना जीपीएस लावा – डॉ. चंद्रशेखर पाटील

इंधन भरणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केल्या होत्या. तरी देखील कुठलीही कार्यवाही न झाल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या. तसेच इंधनाचे दर आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती पुढील स्थायी सभेत मांडण्याची सूचनाही सभापतींनी प्रशासनाला केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---