जळगाव शहर हादरले…! पत्नीनेच केला पतीचा गळा आवळून खून; कानळदा रोडवरील घटना….!

---Advertisement---

 

जळगाव शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीनेच आपल्या पतीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरातील केसी पार्क येथे घडली. भरत पाटील असे मृत पतीचे नाव असून, मनीषा भरत पाटील असे संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे. सुरुवातीला या प्रकरणाकडे अकस्मात मृत्यू म्हणून पाहिले जात होते. मात्र, नंतर समोर आलेल्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत भरत पाटील हे मद्यपानाच्या व्यसनाधीन होते. तसेच ते कर्जबाजारी असल्याने घरातील आर्थिक परिस्थितीही बिघडली होती. घराची जबाबदारी जवळपास पूर्णपणे पत्नी मनीषा पाटील यांच्यावर आली होती. यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मृत भरत पाटील यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृताच्या भावाने आणि पुतण्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला.

यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात भरत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले. या अहवालानंतर पोलिसांनी मनीषा पाटील यांची चौकशी केली असता त्यांनी पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

सततच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून संतापाच्या भरात आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आरोपी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कौटुंबिक तणाव आणि व्यसनाधीनतेमुळे एका कुटुंबाचा झालेला अंत पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न उभे करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---