महिलांना ₹2,500,तर शेतकऱ्यांना मदत अन् मोफत सिलिंडर; विजयच्या ‘गॅरंटी’मुळे तमिळनाडूच्या तिजोरीवर वाढणार ताण?

---Advertisement---

 

Tamil Nadu Politics News : तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय आणि त्याच्या TVK पक्षाच्या निवडणूक घोषणांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर विजयच्या आश्वासनांकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, या योजनांची अंमलबजावणी झाल्यास राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा भार पडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, TVK च्या सर्व कल्याणकारी योजना लागू केल्यास राज्याचा एकूण वेलफेअर खर्च तब्बल 99 हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो. हा खर्च सध्याच्या तुलनेत जवळपास 52 टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
महिलांसाठी TVK ने मोठी घोषणा करत दरमहा ₹2,500 थेट खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेचा लाभ सुमारे 1.57 कोटी महिलांना मिळू शकतो. या योजनेवर राज्याला वर्षाकाठी सुमारे 47 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.


याशिवाय, शेतकऱ्यांसाठी दरवर्षी ₹15 हजार उत्पन्न सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास 79 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होण्याची शक्यता असून, यासाठी सुमारे 11,900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
TVK च्या जाहीरनाम्यात घरगुती योजनांनाही मोठे महत्त्व देण्यात आले आहे. राज्यातील 1.85 कोटी कुटुंबांना वर्षाला 6 मोफत LPG सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या योजनेवर सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो.
तसेच, सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दरवर्षी ₹15 हजार देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यामुळे लाखो कुटुंबांना फायदा होणार असला तरी राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार पडण्याची शक्यता आहे.


तमिळनाडूच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पानुसार राज्याची महसुली प्राप्ती 3.31 लाख कोटी रुपये आहे. त्यात TVK च्या योजनांचा वाटा जवळपास 30 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे महसुली तूट आणि कर्जाचा भार वाढण्याची भीती आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---