---Advertisement---
जळगाव:
जैन हिल्स परिसरात पिकवल्या जाणाऱ्या तब्बल १६० जातींच्या आंब्यांचे अनोखे प्रदर्शन ‘मॅंगो फिएस्टा’ चे उद्घाटन ७ मे रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
याप्रसंगी अशोक जैन आणि ज्योती जैन यांच्या हस्ते आंबावृक्षाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिल्लीचे आयपीएल जनरल मॅनेजर यू. एन. सिंग, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, अतुल जैन यांच्यासह जैन परिवारातील सदस्य आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१६० हून अधिक प्रजाती: या प्रदर्शनात भारतातीलच नव्हे तर थायलंड, मेक्सिको, जपान, ब्राझील आणि इस्रायल अशा विविध देशांतील आंब्यांच्या जाती पाहायला मिळतील.
जगातील सर्वात महागडा आंबा: विशेष आकर्षण म्हणजे जगातील सर्वात महागडा मानला जाणारा ‘मियाझाकि’ आंबा देखील येथे प्रदर्शित करण्यात आला आहे.
संशोधित जाती: जैन इरिगेशनने विकसित केलेल्या टिश्यूकल्चरच्या १३ प्रजाती आणि ४९ संकरित (हायब्रीड) प्रजातींचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
हे प्रदर्शन ८ आणि ९ मे रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे पहिलेच भव्य प्रदर्शन आहे.
प्रदर्शनाचे मुख्य प्रवेशद्वार आंब्याच्या एका भल्यामोठ्या आकर्षक कलाकृतीने सजवले आहे.
दुर्मिळ आणि चविष्ट आंब्यांच्या व्हरायटी एकाच छताखाली पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे.
जळगावकरांनी आणि आंबा प्रेमींनी या ‘मॅंगो फिएस्टा-२०२६’ ला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.









