---Advertisement---
तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते आणि ‘तमिळगा वेत्री कझघम’ (TVK) पक्षाचे अध्यक्ष थलपती विजय यांचा आज होणारा संभाव्य शपथविधी सोहळा अखेर रद्द करण्यात आला आहे. अवघ्या २ आमदारांच्या पाठिंब्याअभावी बहुमताचा आकडा हुकल्याने हा शपथविधी लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
बहुमतासाठी अवघ्या २ जागांची कमतरता
मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजय यांच्याकडे सध्या ११६ आमदारांचा पाठिंबा आहे. तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. आवश्यक बहुमत जुळत नसल्यानेच आजचा शपथविधी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, ‘बनावट समर्थन पत्रा’च्या आरोपावरून तमिळनाडूच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून विजय यांच्या पक्षाने विरोधकांवर थेट हल्ला चढवला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर, थलपती विजय हे व्हीसीके (VCK) पक्षाचे प्रमुख थिरुमावलवन यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य भेटीमुळे चेन्नईतील व्हीसीके कार्यालयाबाहेर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, थलपती विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने अधिकृत प्रत्युत्तर देत विरोधकांचा डाव उलटवून लावला आहे.









