---Advertisement---
वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिक तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी सांगितले की, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर इराणकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही आणि वॉशिंग्टन त्याची प्रतीक्षा करत आहे.
दरम्यान, इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने Strait of Hormuz परिसरात इराणी आणि अमेरिकन नौदल दलांमध्ये किरकोळ चकमकी झाल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे आखाती क्षेत्रातील तणाव आणखी वाढला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने १४ ते १५ मे दरम्यान वॉशिंग्टन डीसी येथे इस्राईल आणि लेबॅनॉन यांच्यात दोन दिवसांची मध्यस्थी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अभास अरागची यांनी अमेरिकेवर टीका करताना म्हटले की, “जेव्हा जेव्हा राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा अमेरिका बेफाम लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारते.” तसेच वॉशिंग्टन दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याचदरम्यान लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांची तीव्रता वाढली असून मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. २ मार्चपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये शुक्रवारी सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे सांगितले जात आहे.
चीनकडे इराणचा तेलविक्रीवर भर
तेहरानस्थित ‘डिप्लोहाऊस’ या थिंक टँकचे संचालक हमीद रजा घोलमजादेह यांच्या माहितीनुसार, अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर इराण विविध देशांशी संपर्क साधत आहे. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची नुकतेच बेईजिंग दौऱ्यावर गेले होते. हा दौरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियोजित चीन दौऱ्याच्या काही दिवस आधी झाला.
घोलमजादेह यांनी सांगितले की, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराण चीनसोबत तेलविक्रीसाठी समन्वय साधत आहे. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात साठवून ठेवलेल्या तेलसाठ्याचाही या चर्चेत समावेश आहे.
तसेच हॉर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षाव्यवस्था, सागरी वाहतुकीचे नियमन आणि क्षेत्रातील स्थैर्य यावरही इराणने चर्चा केल्याचे त्यांनी नमूद केले.









