---Advertisement---
जळगाव : पोलीस मुख्यालय जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. एसपी बंगल्यावरील गार्ड ड्युटीदरम्यान अनुपस्थित राहणे आणि सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचा ठपका संबंधित कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
माहितीनुसार, ८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता तातडीच्या तपासणीदरम्यान पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची पाहणी करण्यात आली. यावेळी ड्युटीवर नियुक्त असलेले नफे/१३७८ रमेश निवृत्ती पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगवान वाघ हे आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित आढळून आले.
तपासणीदरम्यान गार्ड रूममध्ये ठेवण्यात आलेल्या तीन एसएलआर रायफलपैकी एक रायफल कोणत्याही ताब्याविना तसेच आवश्यक दक्षता न घेता ठेवलेली असल्याचे समोर आले. हा प्रकार अत्यंत गंभीर मानत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली.
पोलीस प्रशासनाने या कृत्याला महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन मानले असून संबंधित दोन्ही अंमलदारांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
निलंबन काळात संबंधित कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथेच राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात शिस्त आणि जबाबदारीबाबत स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा सुरू आहे.









