---Advertisement---
गुजरातसह महाराष्ट्रातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने ओखा-मदुराई विशेष गाडीला आता नियमित ओखा-तिरुपती एक्स्प्रेसचा दर्जा दिला असून, ही गाडी आता नियमितपणे धावणार आहे. विशेष म्हणजे या गाडीला जळगाव, भुसावळ आणि अमळनेर स्थानकांवरही थांबा देण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १९५६० ओखा-तिरुपती साप्ताहिक एक्स्प्रेस १९ मे २०२६ पासून नियमित धावणार आहे. ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी ओखा स्थानकावरून सुटणार असून बुधवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी तिरुपती येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक १९५५९ तिरुपती-ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस १४ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. ही गाडी प्रत्येक गुरुवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी तिरुपती येथून सुटेल आणि शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी ओखा येथे पोहोचेल.
तामिळनाडू राज्यातल्या तिरुपती बालाजी दर्शनासाठी वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविक प्रवास करत असतात. तसेच शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनासाठीही या मार्गावर मोठी प्रवासी संख्या आहे. त्यामुळे गाडी नियमित झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ओखा-तिरुपती या एक्स्प्रेसला अपवर डाऊन मार्गावरील द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, नांदेड, निजामाबाद, काचेगुडा, कुर्नूल सिटी, कडपा आणि रेनिगुंटा यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील प्रवाशांना थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने या गाडीत एसी टू टियर, एसी थ्री टियर, स्लीपर क्लास आणि जनरल डब्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच या गाडीचे आरक्षण १० मेपासून आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत होती. विशेष गाडी असल्यामुळे वेळापत्रक आणि उपलब्धतेबाबत अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता नियमित सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना अधिक विश्वासार्ह आणि नियोजित प्रवासाची सुविधा मिळणार आहे









