---Advertisement---
मुंबई : राज्यातील फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यात घातक रसायनांची भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. कृत्रिमरित्या फळे पिकविणे, गोडी वाढविण्यासाठी रसायनांचा वापर करणे तसेच भाजीपाल्यांना आकर्षक रंग देण्याच्या प्रकारांविरोधात शासनाने कडक पावले उचलली आहेत.
राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या आणि थेट पणन परवाना धारकांना यासंदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. बाजार समित्यांनी नियमित तपासण्या करून अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्री रावल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला दर्जेदार शेतमाल सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी फळे कृत्रिमरित्या पिकविणे, रसायनांच्या मदतीने त्यांची गुणवत्ता वाढवल्याचे भासविणे आणि अन्नधान्य अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
याशिवाय, फळे व भाजीपाल्याच्या साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावरही निर्बंध घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याऐवजी पर्यावरणपूरक साहित्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
अन्नधान्य, फळे किंवा भाजीपाल्यात भेसळ अथवा घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या समन्वयाने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित परवाना धारकांचे परवानेही रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









