---Advertisement---
Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबतचे युद्ध ‘अंतिम टप्प्यात’ आल्याचे संकेत दिले असून, शांतता करार झाल्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची तिसऱ्या देशात भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने अल जझिराने याबाबत वृत्त दिले आहे.
रशियाच्या विजय दिन संचलनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले. याचवेळी रशिया आणि युक्रेन यांनी तीन दिवसांच्या युद्धविरामासह १,००० कैद्यांच्या अदलाबदलीवर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात काही प्रमाणात सकारात्मक हालचाली दिसून येत आहेत.
परेडदरम्यान पुतिन यांनी युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैनिकांचे कौतुक करत, त्यांच्या मोहिमेला “आक्रमक शक्तींविरोधातील न्याय्य लढा” असे संबोधले. तसेच, नाटोने युक्रेनला आपल्या प्रभावक्षेत्रात ओढल्याचा आरोपही त्यांनी केला. “हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे,” असे पुतिन म्हणाले.
दरम्यान, मॉस्कोतील रेड स्क्वेअरवर यंदाची विजय दिन परेड तुलनेने साध्या स्वरूपात पार पडली. मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि क्षेपणास्त्र प्रणालींच्या संचलनाऐवजी लष्करी उपकरणांचे व्हिडिओ दाखवण्यात आले. विशेष म्हणजे, उत्तर कोरियाच्या सैन्यानेही प्रथमच या परेडमध्ये सहभाग घेतला.
रशियाने शुक्रवार आणि शनिवारसाठी एकतर्फी युद्धविराम जाहीर केला होता, तर झेलेन्स्की यांनीही ६ मेपासून अशाच युद्धविरामाची घोषणा केली होती. मात्र, दोन्ही देशांकडून युद्धविरामाची पूर्ण अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.









