---Advertisement---
AIMIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांच्या घर, फ्लॅट आणि ऑफिसला अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या असून नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली आहे.
निदा खानला पोलिसांपासून लपवण्यासाठी मतीन पटेल यांनी मदत केल्याचा आरोप आहे. पोलिस तपासात निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये मतीन पटेल यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. नारेगाव परिसरातील कौसर पार्क येथे मतीन पटेल यांनी नुकताच विकत घेतलेल्या फ्लॅटमध्ये निदा खान राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत निदा खानला अटक केली.
दरम्यान, ज्या फ्लॅटमध्ये निदा खान राहत होती ते घर अनधिकृत बांधकाम असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. या घरासह नारेगाव परिसरातील दुसरे घर आणि त्यांच्या कार्यालयालाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करून बांधकाम पाडण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
महापौर समीर राजूरकर यांनी महाराष्ट्र पालिका कायदा 10(1)(ड) अंतर्गत मतीन पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी या वक्तव्याला विरोध करत “मतीन पटेल यांना जनतेने निवडून दिलं आहे, महापौर कोणाचंही पद रद्द करू शकत नाहीत. आम्ही न्यायालयात जाऊ,” असे म्हटले आहे.
मतीन पटेल हे संभाजीनगरमधील प्लॉटिंग व्यवसायिक असून गेल्या अनेक वर्षांपासून AIMIM पक्षात सक्रिय आहेत. ते खासदार इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वीही विविध वादांमुळे मतीन पटेल चर्चेत आले होते. आता निदा खान प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









