---Advertisement---
जळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जामनेर तालुक्यातील एका घरावर टाकलेल्या छाप्यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जामनेर शहरातील विवरेडा रोड परिसरातील एका घरात IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच सट्ट्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडून ९ लाख २ हजार ३०० रुपये रोख, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि सुमारे २५ हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण १० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ऑनलाइन सट्टेबाजीच्या वाढत्या प्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलिस तसेच जामनेर पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.









