---Advertisement---
जळगाव: अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जप्त केलेला मोठा साठा आज नष्ट करण्यात आला. एकूण २३ गुन्ह्यांमधील १३६२ किलो गांजा, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये आहे, तो आज जाळून नष्ट करण्यात आला.
कायदेशीर प्रक्रियेनंतर कारवाई
मा. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी श्री. राहुल गायकवाड यांनी या जप्त केलेल्या मुद्देमालाचा आढावा घेऊन समितीसमोर प्रस्ताव सादर केला होता.
पर्यावरणाची काळजी घेत विल्हेवाट
आज दिनांक ११ मे २०२६ रोजी, जिल्हापेठ पोलीस स्टेशन इमारतीच्या मागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अमली पदार्थ नाश समितीसमोर ही प्रक्रिया पार पडली. यावेळी खड्डा खोदून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, अशा पद्धतीने संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली प्रक्रिया
यावेळी समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी श्री. विकास बोरसे आणि वजन मापे निरीक्षक श्री. राजेंद्र व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. संजय दोरकर, पोह. संदीप पाटील, जयंत चौधरी, अजय पाटील आणि रवींद्र चौधरी यांच्या पथकाने परिश्रम घेतले.









