---Advertisement---
जळगाव : उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून, हवामान विभागाने मंगळवारी जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ राहत असले तरी उकाड्यात कोणतीही घट झालेली नाही. उलट दमट आणि कोरड्या हवेमुळे उष्णतेचा चटका अधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळेत ग्रामीण भागातील रस्ते ओस पडत असून, शहरांमध्येही नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत असून, शेती, पशुधन आणि पाणीसाठ्यांवरही गंभीर परिणाम दिसून येत आहे.
राज्यात रविवारी जळगाव येथे सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी विदर्भातील अकोला येथे तापमानाचा पारा ४५.१ अंशांपर्यंत पोहोचला. जळगावमध्येही तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर कायम राहिल्याने नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. अनेक भागांत विहिरींची पातळी झपाट्याने कमी होत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण भारताच्या परिसरात सक्रिय झालेल्या विविध हवामान प्रणालींमुळे राज्यातील तापमानात अचानक वाढ होत आहे. मन्नारचा आखात आणि श्रीलंका परिसरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच लक्षद्वीप बेटे आणि केरळ किनारपट्टीलगतही चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. या हवामान घडामोडींमुळे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र झाल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.









