---Advertisement---
महाराष्ट्रातील पोलिस दलासाठी राज्य सरकारकडून मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ५४५९ पोलिस कर्मचाऱ्यांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून १७६८.०८ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना स्वतःचे घर मिळावे, यासाठी सरकार सुरुवातीपासूनच प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. २०१४ ते २०१९ या कालावधीत मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना बंद करण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारने ही योजना नव्याने सुरू केली. आता महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देत १७६८.०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. वाढत्या महागाईच्या काळात घर खरेदी करणे किंवा बांधणे सामान्य कर्मचाऱ्यांसाठी कठीण होत असताना सरकारच्या या मदतीमुळे मोठा आधार मिळणार आहे.
राज्य सरकारकडून पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून भविष्यातही अशा सुविधा वाढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.









