---Advertisement---
कॅरिबियन देश Cuba सध्या इतिहासातील सर्वात भीषण ऊर्जा संकटाचा सामना करत असून, देशातील पेट्रोल-डिझेलचा साठा जवळपास संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजधानी हवानासह अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे कोलमडला असून, सरकारला ‘ब्लॅकआउट’ची घोषणा करावी लागली आहे.
क्युबाचे ऊर्जा मंत्री व्हिसेणते दे ला ओ यांनी सरकारी माध्यमांशी बोलताना देशाकडे इंधनाचा कोणताही राखीव साठा उरलेला नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय वीज ग्रिडची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून, नागरिकांना दिवसातील २० ते २२ तास वीज कपातीचा सामना करावा लागत आहे.
सध्या क्युबामध्ये स्थानिक कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि मर्यादित सौर ऊर्जेच्या मदतीने वीज व्यवस्था कसाबसा सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, वीज निर्मिती केंद्रांची खराब अवस्था आणि वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
दरम्यान, देशात अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सततच्या वीज कपातीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दशकांतील ही सर्वात मोठी ऊर्जा आणीबाणी मानली जात आहे.
गेल्या दोन वर्षांत क्युबाने सौर ऊर्जा क्षमता सुमारे १,३०० मेगावॅटपर्यंत वाढवली असली तरी इंधन टंचाई आणि ग्रिडमधील अस्थिरतेमुळे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकत नाही.
या संकटामागे जागतिक राजकारणही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी क्युबाला मदत करणाऱ्या मेक्सि्को आणि वेनेझुला यांनी इंधन पुरवठा थांबवल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या आदेशांनंतर या देशांनी क्युबाला इंधन पाठवणे बंद केल्याचा दावा ऊर्जा मंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे क्युबा आता अभूतपूर्व ऊर्जा संकटाच्या गर्तेत अडकला आहे.









