“माझ्या मुलाला न्याय द्या…” १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूप्रकरणी हताश बापाची पोलीस ठाणे ते एसपी कार्यालयापर्यंत पायपीट…!

---Advertisement---

 

धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वडिलांनी गंभीर आरोप करत न्यायासाठी पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवले आहेत. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मुलाच्या छातीत बॅट मारून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप मयत बालकाचे वडील नवल पाटील यांनी केला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ते पाळधी पोलीस ठाणे ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत न्यायासाठी पायपीट करत आहेत.

मयत बालकाचे नाव गणेश नवल पाटील (वय १२) असे असून, तो गावातील मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. यावेळी किरकोळ वाद झाल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या एका मुलाने गणेशच्या छातीत जोरात बॅट मारल्याचा आरोप नवल पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

घटनेनंतर सुरुवातीला गणेशला चक्कर येऊन तो खाली पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धक्क्यात असलेल्या कुटुंबीयांनी कोणताही संशय न घेता पोस्टमार्टम न करता अंत्यसंस्कार केले. मात्र नंतर गावात चौकशी केल्यानंतर मुलाच्या मृत्यूमागील वेगळे सत्य समोर आल्याचा दावा नवल पाटील यांनी केला आहे.

या प्रकरणात संबंधित मुलगा तसेच त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परंतु पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अखेर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत लेखी तक्रार सादर केली.

“माझ्या मुलाला न्याय मिळावा, एवढीच मागणी आहे,” असे म्हणताना नवल पाटील भावुक झाले. डोळ्यांत अश्रू आणि मनात न्यायाची अपेक्षा घेऊन ते प्रशासनाकडे धाव घेत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिली आहे. “चौकशीत कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---