लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शहर पोलिसात गुन्हा दाखल, जळगावातील तरुणाला अटक…!

---Advertisement---

 

लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर जळगाव शहरातील विविध हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी रोशन मुकेश निकम (रा. निमखेडी, ता. जळगाव) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख सन २०२४ मध्ये तिच्या मैत्रिणीमार्फत इन्स्टाग्रामवर रोशन निकम याच्याशी झाली होती. सुरुवातीला सोशल मीडियावर संवाद सुरू झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मार्च २०२४ मध्ये जळगावातील एका कॅफेमध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर मोबाईलवर सातत्याने संपर्क वाढत गेला.

रोशन निकम याने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले होते. तसेच आपल्या कुटुंबीयांशीही तिची भेट घालून दिली होती. याच विश्वासातून मार्च २०२४ मध्ये त्याने नवीपेठ परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये तरुणीला पुण्यात नोकरी लागल्याने ती पुण्यात राहू लागली. मात्र रोशनचे वागणे बदलल्याने आणि तो कमी बोलू लागल्याने तरुणीला त्याचे दुसऱ्या कोणासोबत संबंध असल्याचा संशय आला. याबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दि. ११ मे रोजी तरुणी जळगावला आल्यानंतर संशयिताने तिला कुसुंबा नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तरसोद येथील गणपती मंदिरात लग्न करू, असे सांगून पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघे मंदिरात गेले असता कार्यालय बंद असल्याने ते परतले. पुढे पुण्यात येऊन आळंदी येथे लग्न करू, असे सांगून संशयिताने तरुणीला परत पाठविले.

मात्र दुसऱ्याच दिवशी रोशन निकम याने तरुणीचा मोबाईल क्रमांक आणि सोशल मीडियावरील संपर्क बंद केला. चौकशी केल्यानंतर त्याचे दुसरीकडे लग्न ठरत असल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यानंतर आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची जाणीव झाल्याने तिने पुणे येथे पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानुसार हा गुन्हा जळगाव शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तपास करत संशयित रोशन निकम याला अटक केली असून पुढील तपास उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---