---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांसह वाहनधारकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. तर काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्यामुळे विक्री बंद ठेवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पेट्रोल पंप चालक-मालक, व्यापारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना, साठा व्यवस्थापन तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. वाढत्या टंचाईमुळे जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.









