---Advertisement---
ऑनलाइन औषध विक्रीच्या (E-Pharmacy) शासनाच्या धोरणाविरोधात आज जळगाव जिल्ह्यासह देशभरातील औषध विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत देशव्यापी संप पुकारला. या आंदोलनांतर्गत जळगाव जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजारांहून अधिक औषध विक्रेते दुकाने बंद ठेवून संपात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विक्रेत्यांनी ऑनलाइन औषध विक्रीची चक्क प्रतिकात्मक ‘अंत्ययात्रा’ काढून शासनाचा तीव्र निषेध केला.
जळगाव जिल्हा औषध विक्रेते संघटनेच्या नेतृत्वात आज जिल्ह्यातील सर्वच औषध दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. आंदोलक विक्रेत्यांनी डोक्यावर काळी टोपी आणि हाताला काळ्या फिती लावून या धोरणाचा निषेध केला. शहरातून ऑनलाइन औषध विक्रीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शासनाच्या ऑनलाइन औषध विक्रीच्या धोरणामुळे स्थानिक व्यवसाय तर अडचणीत आला आहेच, शिवाय ग्राहकांच्या जिवाशीही खेळ होत असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला.
औषध विक्रेत्यांच्या मुख्य मागण्या आणि आरोप
ऑनलाइन औषध विक्रीमुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (Prescription) किंवा बनावट चिठ्ठ्यांच्या आधारे औषधांचा गैरवापर वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
वर्षानुवर्षे सेवा देणारा पारंपरिक किरकोळ औषध विक्रेता कॉर्पोरेट आणि ऑनलाइन कंपन्यांच्या स्पर्धेमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.
केंद्र व राज्य सरकारने ऑनलाइन औषध विक्रीवर तात्काळ आणि पूर्णपणे बंदी घालावी.
तीव्र आंदोलनाचा इशारा
“ऑनलाइन औषध विक्रीमुळे औषध क्षेत्राचे मोठे नुकसान होत असून रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. शासनाने ही ऑनलाईन विक्री तात्काळ बंद न केल्यास, आगामी काळात संपूर्ण देशात तीव्र लाक्षणिक संप आणि याहूनही मोठे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या संपामुळे दिवसभर रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची औषधांसाठी काही प्रमाणात धावपळ उडाली, मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून काही ठिकाणी आपत्कालीन औषध पुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. या आंदोलनामुळे आता शासन ऑनलाइन फार्मसीबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









