---Advertisement---
जिल्ह्यात ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाच्या पूर्वहंगामी लागवडीला यंदा डिझेल टंचाईचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असून हजारो हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील डिझेल पुरवठा कमालीचा विस्कळीत झाल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेतीची मशागत आणि पेरणी लांबणीवर पडली असून, शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाला आहे.
यंत्रयुगात मशागत ठप्प
दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात जळगाव जिल्ह्यातील शेताशिवारांमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची मशागत आणि पेरणी वेगाने उरकली जाते. यंदा मात्र चित्र उलटे आहे. डिझेलचा पुरवठा सुरळीत नसल्याने जिल्ह्यातील अनेक पंपांवर इंधनाची टंचाई भासत आहे. परिणामी, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच ट्रॅक्टर जागेवरच थांबून आहेत. मशागत वेळेत न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना पूर्वहंगामी कापसाची लागवड करता आलेली नाही.
ट्रॅक्टर सोडून पुन्हा बैलजोडीचा आसरा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेती कामे गतीने होतील या आशेने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर वाढवला होता. परंतु, ऐन गरजेच्या वेळी डिझेल मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे वळण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी नाईलाजाने बैलजोडीच्या साहाय्याने शेतीची मशागत आणि पेरणी करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, वेळेत कामे पूर्ण न झाल्यास कापसाच्या उत्पादनावर याचा थेट विपरीत परिणाम होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोट (शेतकऱ्याची प्रतिक्रिया)
”दरवर्षी या दिवसांत आमची कापूस लागवड पूर्ण व्हायची. यंदा मात्र डिझेलचा एवढा तुटवडा आहे की ट्रॅक्टरला इंधन मिळेनासं झालंय. मशागत वेळेत झाली नाही तर पेरणी कशी करणार? आधीच निसर्गाची साथ नसते, आता कृत्रिम टंचाईमुळे आमचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.” गोपाल पवार, कापूस उत्पादक शेतकरी, जळगाव.









