---Advertisement---
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली जात आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतरही पेट्रोल पंप चालकांकडून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला जात असून, शेतकऱ्यांना कॅन किंवा डब्यांमध्ये डिझेल देण्यास मनाई केली जात आहे. या गंभीर समस्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी मनसेच्या मागण्यांची गंभीर दखल घेत, ऑनलाईन पेमेंट नाकारणाऱ्या पंपांवर तातडीने कारवाई करण्याचे आणि शेतकऱ्यांना इंधन पुरवण्याचे आदेश जारी करण्याचे आश्वासन दिले आहे.
तासनतास रांगेत उभे राहूनही ‘कॅश’ची सक्ती; नागरिक त्रस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इंडिया’चा नारा देत असताना, जळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक मात्र या धोरणाला हरताळ फासत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सध्या इंधन टंचाईमुळे नागरिकांना ४ ते ५ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, ऐनवेळी पंप चालकांकडून ‘फक्त कॅश’ची अट घातली जाते. यामुळे नागरिकांना एटीएम शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असून, अनेकांना इंधनाशिवाय रिकाम्या हाती परत जावे लागत आहे.
शेतकऱ्यांची अडवणूक; शेतीची कामे ठप्प
शेतीकामासाठी लागणारे पाण्याचे पंप, जनरेटर, फवारणी यंत्रे किंवा पॉवर टिलर थेट पेट्रोल पंपावर आणणे शेतकऱ्यांना शक्य नसते. असे असतानाही अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डब्यात किंवा कॅनमध्ये डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांची कामे खोळंबली असून त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
१. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर UPI, QR Code आणि कार्ड पेमेंट सक्तीने स्वीकारण्याचे आदेश द्यावेत.
२. ऑनलाईन पेमेंट नाकारणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर तातडीने कायदेशीर कारवाई व्हावी.
३. इंधन टंचाईच्या काळात नागरिकांना मनस्ताप होणार नाही यासाठी विशेष नियंत्रण ठेवण्यात यावे.
४. शेतकरी बांधवांना शेती अवजारांसाठी कॅन/डब्यात डिझेल-पेट्रोल देण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात.
५. प्रत्येक पेट्रोल पंपावर “ऑनलाईन पेमेंट उपलब्ध आहे” असे फलक लावणे बंधनकारक करावे.
पुरवठा अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन
मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांची आणि शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी या संदर्भात तातडीने कारवाईचे आदेश देणारे पत्र काढण्याचे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले.
या आंदोलनाप्रसंगी मनसेचे ॲड. जमील देशपांडे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी बिल, राहुल चव्हाण, राजेश मराठे, बादशहा शहा, अमजित खाटीक, दीपक राठोड, महेंद्र सपकाळे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









