---Advertisement---
राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा मोठा फटका आता जळगाव जिल्ह्यातील केळी निर्यातीला बसू लागला आहे. रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरात केळी वाहतुकीसाठी विविध राज्यांतून आलेले हजारो ट्रक गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अडकून पडले आहेत. डिझेल उपलब्ध होत नसल्याने केळीची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून शेतकरी, व्यापारी आणि ट्रक चालक मोठ्या संकटात सापडले आहेत.
डिझेलअभावी ट्रक चालकांना दिवसन्दिवस रस्त्यावरच थांबून राहावे लागत आहे. त्यामुळे जेवण, राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्चात मोठी वाढ झाली असून चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनेक ट्रकांमध्ये भरलेली केळी वेळेत बाजारपेठेत पोहोचत नसल्याने माल खराब होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्हा हा देशातील प्रमुख केळी उत्पादक पट्टा मानला जातो. येथून दररोज मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात विविध राज्यांमध्ये केली जाते. मात्र, डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, सरकारने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करून अडकलेल्या ट्रक चालकांना दिलासा द्यावा आणि केळी वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ट्रक चालकांसह व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.









