---Advertisement---
जळगाव/मुंबई: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आधीच जवळपास एक हजार रुपयांची मोठी वाढ झालेली असताना, आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचाही भडका उडाला आहे. मागील अवघ्या ४ दिवसांत इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून, चालू मे महिन्यातील ही तब्बल चौथी दरवाढ आहे. आज, २५ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
१० दिवसांत ८ रुपयांची वाढ!
नवीन दरांनुसार, पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ७३ पैसे, पॉवर पेट्रोल २ रुपये ७३ पैसे, तर डिझेल २ रुपये ८१ पैशांनी महागले आहे. यापूर्वी १५ मे, १९ मे आणि २३ मे रोजी इंधनाचे दर वाढले होते. आज २५ मे रोजी झालेल्या या चौथ्या दरवाढीमुळे अवघ्या दहा दिवसांत वाहनचालकांच्या इंधन खर्चात प्रतिलिटर सुमारे ८ रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कररचनेत झालेले बदल यामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव आणि मुंबईतील आजचे नवे दर (प्रतिलिटर):
जळगाव: पेट्रोलचा दर ₹११३.१७ वर पोहोचला असून, डिझेल ₹९९.८४ झाले आहे. (डिझेल १०० रुपयांच्या उंबरठ्यावर आहे).
मुंबई: पेट्रोल २.७६ रुपयांनी वाढून ₹१११.२१, तर डिझेल २.८१ रुपयांनी वाढून ₹९७.८३ झाले आहे.
दिल्ली: पेट्रोल ₹१०२.१२ आणि डिझेलचा दर ₹९५.२० प्रतिलिटर झाला आहे.
मालवाहतूक महागणार; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
या लागोपाठच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. सर्वात महत्त्वाची चिंता म्हणजे डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे देशभरात मालवाहतुकीचा (वाहतूक खर्च) खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम येत्या काही दिवसांत भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









