कांद्याला मिळेना भाव, कर्जाचा डोंगर अन् निसर्गाचा कोप; नाशिकमध्ये हतबल कांदा उत्पादकाने संपवली जीवनयात्रा!

---Advertisement---

 

बदलते हवामान, बाजारपेठेत कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव आणि बँकेच्या वाढत्या कर्जबाजारीपणामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील राहुड येथील एका ५९ वर्षीय कांदा उत्पादक शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुलाब केशव निकम असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण सटाणा परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे आणि शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मृत गुलाब निकम हे केवळ तीन एकर शेतीवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी विविध बँकांचे कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे ते पुरते अडचणीत आले होते. त्यातच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान केले.
​एकीकडे पिकाचे अतोनात नुकसान आणि दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने निकम यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. या दुहेरी संकटामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक विवंचनेत आणि नैराश्यात होते. याच मानसिक तणावातून अखेर त्यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आयुष्य संपवले. सटाणा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.


इंधन तुटवड्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
​नाशिक जिल्हा ही आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र, सध्या याच बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. त्यातच भर म्हणून सध्या ग्रामीण भागात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. डिझेल अभावी शेती नांगरणी, मशागत आणि पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. ऐन हंगामाच्या तोंडावर ट्रॅक्टर गॅरेजमध्ये उभे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


कांदा उत्पादकांच्या प्रमुख मागण्या
​सरकारच्या चुकीच्या आणि शेतकरीविरोधी धोरणांमुळेच आज बळीराजावर आत्महत्येची वेळ येत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांनी सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत:
कांद्याला प्रति क्विंटल किमान ३ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५०० रुपये थेट अनुदान द्यावे.
शेतीकामांसाठी ग्रामीण भागात डिझेलचा पुरवठा तात्काळ सुरळीत करावा.
​बळीराजाचा हा आक्रोश सरकार कधी ऐकणार आणि अशा दुर्दैवी आत्महत्या कधी थांबणार, असा संतप्त सवाल आता नाशिकच्या शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---