---Advertisement---
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे जिल्ह्यातील लळींग घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हल्स वाहनामध्ये जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले तर काहींचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, अपघातानंतर मदतकार्य सुरू असताना आणखी एक दुर्दैवी घटना घडली. टोल नाक्यावरील पेट्रोलिंग वाहनातील एक कर्मचारी अपघातग्रस्तांना मदत करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी मृत कर्मचाऱ्याला न्याय मिळावा या मागणीसाठी टोल नाका बंद ठेवत आंदोलन सुरू केले. गेल्या दोन तासांपासून टोल नाका ठप्प असून महामार्गावर तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस आणि प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.








