---Advertisement---
जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणाऱ्या हमाल कामगारांचा रोजगार धोक्यात आला असून, आपल्या मागण्यांसाठी ‘जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटना’ आता आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरली आहे. शासनाच्या नव्या निर्णयामुळे गोदामातील काम पूर्णपणे बंद होऊन ते वाहतूक ठेकेदारांना देण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेकडो हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात आज, २५ मे ते उद्या २६ मे असे दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास २७ मेपासून संपूर्ण जिल्ह्यात बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
वाहतूक ठेकेदारांमुळे माथाडी कामगारांचा रोजगार धोक्यात
शासकीय धान्य गोदामांमध्ये वर्षानुवर्षे हमालीचे काम करून कुटुंब चालवणाऱ्या हमाल कामगारांना डावलून हे काम वाहतूक ठेकेदारांना सोपवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे माथाडी मंडळाकडे रीतसर नोंदणीकृत असलेल्या हमालांचे काम हिरावले जात आहे. ठेकेदारांच्या मनमानीमुळे हमालांचे हक्क मारले जात असल्याचा आरोप कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉर्मेड रवींद्र सपकाळे आणि जिल्हा सरचिटणीस शरद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. “जे हमाल कामगार माथाडी मंडळात नोंदणीकृत आहेत, त्यांनाच गोदामातील हमालीचे काम दिले पाहिजे. तसेच संबंधित ठेकेदारांनी हमालांची मजुरी आणि लेव्हीची रक्कम नियमानुसार माथाडी मंडळातच जमा करावी,” अशी ठाम मागणी संघटनेने लावून धरली आहे.
२५ व २६ मे (दोन दिवस): जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लाक्षणिक धरणे आंदोलन.
२७ मे पासून: मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन.
मुख्य मागणी: धान्य गोदामातील काम केवळ नोंदणीकृत माथाडी कामगारांनाच द्यावे आणि ठेकेदारांनी मजुरीची रक्कम माथाडी मंडळात जमा करावी.
आमदार आणि प्रशासनाला साकडे, मुंबई दरबारी अर्ज पाठवण्याची विनंती
या आंदोलनाची दखल घेत जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जळगाव तहसीलदार यांनाही या निवेदनाच्या प्रती सादर करून हमालांच्या बाजूने प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली आहे. हमाल कामगारांचा हा हक्काचा लढा आणि अर्ज तात्काळ मुंबई येथे शासन दरबारी पाठवावा, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रराज सपकाळे, मुकादम सीगर हटकर यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो हमाल आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.









