पुण्यात डांबून ठेवलेल्या जळगावच्या ऊसतोड कामगारांच्या सुटकेसाठी ‘भिल प्रदेश क्रांती सेना’ आक्रमक; आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

---Advertisement---

 

जामनेर तालुक्यातील ऐकुलती येथील एकाच आदिवासी भिल कुटुंबातील ४ सदस्यांसह ३ अल्पवयीन मुलांना पुणे जिल्ह्यातील दौंड येथे डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ऊसतोड कामगारांची तातडीने सुटका करावी आणि इतर प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी ‘भिल प्रदेश क्रांती सेने’च्या वतीने आज, २५ मे २०२६ पासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत न्याय मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
​संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप. धनेश दादा ठाकरे आणि आप. सुनिलभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

​निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, मौजे ऐकुलती (ता. जामनेर) येथील रहिवासी असलेले आदिवासी भिल समाजाचे ऊसतोड कामगार नरसिंग जुबा भिल, धनाबाई नरसिंग भिल, आबा नरसिंग भिल, उषाबाई आबा भिल यांच्यासह त्यांच्या ३ अल्पवयीन मुलांना गुऱ्हाळ मालक अमोल आबा थोरात याने ‘दावजीबुवा वाडी’ (ता. दौंड, जि. पुणे) येथे बेकायदेशीरपणे डांबून ठेवले आहे. या सर्व कामगारांवर अत्याचार होत असून त्यांची तिथून तात्काळ सुटका करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेने लावून धरली आहे.

​१. कामगारांची सुटका: पुणे येथे डांबून ठेवलेल्या ऐकुलती येथील सर्व आदिवासी कामगारांची व बालकांची तात्काळ सुटका करावी.
२. जमीन वाटप: ४५६.८७ एकर जमीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी प्रस्तावित केली आहे, ती शासनाने खरेदी करून आदिवासी भूमिहीन शेतमजुरांना वाटावी.
३. अतिक्रमण नियमन: सन २०११ पूर्वीचे गायरान, गावठाण व गुरचरण जमिनीवरील शेतीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे आदेश प्रांत व तहसीलदारांना द्यावेत.
४. राहती घरे नावे करणे: अनुसूचित जमातीचे लोक ज्या गायरान किंवा गावठाण जमिनीवर राहत आहेत, त्यांच्या राहत्या घराखालील जागा त्यांच्या नावे कराव्यात.
५. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य: आदिवासी विकास विभाग यावल अंतर्गत वर्ग-४ (चौकीदार) पदाची भरती स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष पद्धतीने व्हावी.
६. योजनांचा लाभ: ‘धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ व प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विहित नमुन्यात अर्ज मागवून त्वरित द्यावा.


​न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही!
​”आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी आणि पुण्यात अडकलेल्या आमच्या बांधवांच्या सुटकेसाठी आम्ही हे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाईचे आदेश निघत नाहीत, तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हलणार नाही,” असा इशारा उपोषणकर्ते श्री. रवींद्र नरसिंग भिल, श्री. दिलीप देवसिंग भिल आणि श्री. मानसिंग झुबा भिल यांनी दिला आहे.
​या आंदोलनात भिल प्रदेश क्रांती सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---