---Advertisement---
भुसावळ शहरातील आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या हिरव्यागार वृक्षांची कथित विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’ आक्रमक झाली आहे. संबंधित शाळा प्रशासन आणि वृक्षतोडीस जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा २८ मेपासून भुसावळ नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
समितीने मुख्याधिकारी आणि प्रभारी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता भरदिवसा ही वृक्षतोड करण्यात आली. ही घटना ‘महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५’ मधील कलम ८ चे थेट उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नगरपरिषदेचे अधिकारी धनराज बाविस्कर यांनी देखील संबंधित वृक्षतोडीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धन व विकास समितीने प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर तात्काळ FIR दाखल करणे, २७ मे २०२६ पर्यंत ठोस कारवाई करणे आणि कारवाई न झाल्यास २८ मे रोजी सकाळी ११ वाजेपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे उर्फ अप्पा, तालुकाध्यक्ष पवन नाले, मुरलीधर लोखंडे, शेखर धांडे, प्रांजल पाटील तसेच दीपक वाणी आणि मयूर सुरवाडे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या घटनेमुळे भुसावळ शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









