---Advertisement---
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. जळगाव येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून जळगाव विधान परिषद मतदारसंघाची जागा शिवसेनेनेच लढवावी, यावर स्थानिक नेत्यांनी एकमत दर्शवले आहे.
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप लांडे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जळगाव विधान परिषद मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत असल्याने ही जागा शिवसेनेनेच लढवावी, अशी भूमिका नेत्यांनी मांडली. बैठकीतील हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
यासोबतच जळगाव विधान परिषद जागेसंदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच मुंबईत जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यास मैत्रीपूर्ण लढतीची तयारी देखील शिवसेनेकडून ठेवण्यात आल्याचे संकेत बैठकीतून देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय समीकरणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









