शहाद्यात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

शहादा शहरातील सौभाग्य मंगल कार्यालयाजवळील पाटचारी परिसरात जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून एका २८ वर्षीय तरुणावर दगडफेक करत, डोक्यात मोठा दगड घालून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिलेश संजय जोहरी (वय २८, रा. नारायण धाम, शहादा, मूळ रा. गुडगाव, हरियाणा – अमेरिकन एक्सप्रेस बँक कर्मचारी) हे २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सौभाग्य मंगल कार्यालयाजवळील पाटचारी येथे सिमेंटचे ब्लॉक पायाने पाईपकडे ढकलत होते.

यावेळी पूर्ववैमनस्यातून आरोपी चेतन संजय शेळके, संजय काशिनाथ शेळके आणि त्यांचा मित्र मोहिते (पूर्ण नाव माहीत नाही, तिघे रा. प्रकाश नगर, शहादा) यांनी संगनमत करून निखिलेश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चेतन आणि संजय शेळके यांनी निखिलेश यांच्यावर दुरून दगड फेकून मारले, मात्र निखिलेश यांनी तो वार चुकवला. यानंतर आरोपी चेतन शेळके याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हाताने मोठा दगड उचलून निखिलेश यांच्या डोक्यात टाकला. या हल्ल्यात निखिलेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली.
       
या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS)-२०२३ च्या कलम १०९, ११५ (२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---