---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना मानपूर महार वतन जमीन प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने एकनाथ खडसे व त्यांची कन्या शारदा खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
साखर कारखान्याच्या नावाखाली महार वतन जमीन हडपल्याचा आरोप करत बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे व शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणूक, कागदपत्रांत फेरफार तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणावर भुसावळ न्यायालयात सुनावणी पार पडली.सुनावणीदरम्यान न्यायालयाने एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे खडसे यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.









