महाविकास आघाडीचं ठरलं! विधानपरिषद जागांच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्मुला ठरला; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ विधानपरिषद जागांच्या निवडणुकीसाठी महाविकासआघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत १५ जागांवरील वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असून, उर्वरित दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाविकासआघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, अंबादास दानवे, तसेच मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. बैठकीनंतर मविआ सर्व १७ जागा एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात थेट राजकीय सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार काँग्रेसला ८ जागा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर पोटनिवडणुकीचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाला रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली आणि संभाजीनगर या चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या तीन जागांवर निवडणूक लढवू शकतो.

मात्र नाशिक आणि नांदेड या दोन मतदारसंघांवरून अजूनही तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट या तिन्ही पक्षांनी या जागांवर दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे या दोन जागांबाबतचा अंतिम निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

“१६ नियमित जागा आणि नागपूरची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकासआघाडी एकत्र लढणार आहे. जागावाटपाची चर्चा सकारात्मक वातावरणात झाली असून बहुतांश जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित दोन जागांवर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर सांगितले.

महाविकासआघाडीने निवडणुकीसाठी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी नाशिक आणि नांदेडमधील जागावाटपाचा पेच पुढील काही दिवसांत राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---