---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. शुक्रवारी २० इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांकडून २१ अर्ज नेले असून आज अखेर एकूण ४७ इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी ८४ उमेदवारी प्रपत्र नेले आहेत. तसेच शुक्रवार २८ मे रोजी प्रवीण गंगाराम पाटील अमळनेर या अपक्ष उमेदवाराने नामांकन प्रपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दखल केले आहे.
राज्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात २०२२ दरम्यान मुदत संपुष्टात आलेल्या एक जागेसाठी निवडणूक घेण्यात येत असून १८ मे पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालावधी शासकिय सुटी कालावधी वगळता २५ मे ते १ जून असा आहे. दरम्यान विविध राजकिय पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारी मिळवत नामनिर्देशनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आतापर्यत जिल्हा पातळीवर अनेक बैठका व चर्चा पार पडल्या असून थेट मुंबई व दिल्लीवारी पर्यंत खलबते, बंद दाराआड गुप्त समझोते बैठका चर्चाही झाली आहेत.
वरवर शांत दिलजमाई असणाऱ्या बैठका असल्या तरी आतमध्ये मात्र अशांत व खळबळ असून महायुती तसेच महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून होत असलेल्या बैठकांमधून उमेदवारीसाठी आडाखे अंदाज सपशेल फोल ठरत असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सूकता शिगेला पोचली असून निवडणूक शांत वा आखाडेयुक्त पार पडणार हे नामनिर्देशन पत्र छाननी व ४ जून रोजी माघारीनंतरच कळणार असून शुक्रवार २८ मे रोजी प्रवीण गंगाराम पाटील अमळनेर या एकमेव अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाला असल्याचे निवडणूक प्रशासनाने म्हटले आहे.









