---Advertisement---
पाइप गॅस (PNG) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १ जून २०२६ पासून एलपीजी (LPG) नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल होत आहेत. नव्या नियमांनुसार, आता ‘एक कुटुंब, एक कनेक्शन’ हे धोरण कडकपणे लागू केले जाणार आहे. जर एखाद्या कुटुंबाकडे पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही कनेक्शन असतील, तर त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते.
नेमका काय आहे नवा नियम?
केंद्र सरकारने देशात पीएनजीचा वापर वाढवण्यासाठी व्यापक मोहीम राबवली आहे, ज्या अंतर्गत मार्चअखेर ६.५ लाख नवीन कनेक्शन देण्यात आले. मात्र, अनेक कुटुंबांनी पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतरही आपले एलपीजी सिलिंडर कनेक्शन सरेंडर केलेले नाही.
३० दिवसांची मुदत: नवीन नियमानुसार, पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत ग्राहकांना आपले एलपीजी कनेक्शन बंद करावे लागेल.
पुरवठा बंद होणार: निश्चित वेळेत एलपीजीवरून पीएनजीवर स्विच न झाल्यास, तेल कंपन्यांकडून एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल. तसेच, अशा ग्राहकांना १ जूनपासून नवीन सिलिंडर बुक करता येणार नाही.
साठेबाजी आणि काळाबाजाराला बसणार आळा
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी तेल पुरवठा कंपन्यांनी (OMCs) आता पीएनजी आणि एलपीजीचा एकाच वेळी वापर करणाऱ्या ग्राहकांचा शोध सुरू केला आहे. यासाठी सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD) आणि तेल कंपन्यांचा डिजिटल डेटाबेस एकत्र केला जात असून, एकाच पत्त्यावर दोन्ही कनेक्शन असणाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे.
महत्त्वाची तरतूद: जर एखाद्या ग्राहकाने एलपीजी कनेक्शन बंद केले आणि भविष्यात तो अशा ठिकाणी स्थलांतरित झाला जिथे पीएनजी सुविधा उपलब्ध नाही, तर त्याला पुन्हा एलपीजी कनेक्शन सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
सिलिंडर बुकिंगच्या ‘लॉक-इन’ कालावधीत बदल
सिलिंडरचा तुटवडा कमी करण्यासाठी आणि गैरवापर टाळण्यासाठी रिफिलिंगच्या कालावधीत (Lock-in Period) मोठे बदल करण्यात आले आहेत:
शहरी भाग: दोन सिलिंडर बुकिंगमधील कालावधी २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे.
ग्रामीण भाग: ग्रामीण भागासाठी हा लॉक-इन कालावधी ४५ दिवस असणार आहे.
सबसिडी नियम: देशभरात कुटुंबांना वर्षाला मिळणारे १२ सबसिडीचे सिलिंडर पूर्ववत मिळत राहतील. त्यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असल्यास बाजारभावानुसार (विना-सबसिडी) पैसे मोजावे लागतील.
पेट्रोलियम अँड नॅच्यूरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने (PNGRB) पीएनजी जोडण्यांना गती देण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय पीएनजी मोहीम २.०’ आता ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात एलपीजी वापरकर्त्यांची संख्या ३३.५ कोटी आहे, तर पीएनजी वापरकर्ते १.६४ कोटींवर पोहोचले आहेत.









