---Advertisement---
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी हातामध्ये ‘कमळ’ घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे यांच्या पक्षबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर आज या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले असून, हा निर्णय शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे (शप) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
‘तो माझा भाचा, त्याचा निर्णय धक्कादायक’ – जयंत पाटील
प्राजक्त तनपुरे हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे असल्याने या पक्षप्रवेशाचा वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर जयंत पाटील यांना मोठा संताप आणि खंत लागल्याचे दिसून आले. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले:
”प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मी ऐकले, मात्र माझा त्यांच्याशी थेट संपर्क होऊ शकला नाही. प्राजक्त यांनी भाजपमध्ये जाणे हे आमच्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे. परंतु, त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती आणि राजकीय समीकरणे पाहूनच हा निर्णय घेतला असावा, असे मला वाटते.”
’सगळ्याच अडचणी कॅमेऱ्यासमोर सांगायच्या नसतात’ – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रवेशावर अत्यंत मार्मिक आणि मर्मभेदी भाष्य करत भाजपवर थेट निशाणा साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या:
”प्राजक्त कालच मला भेटायला आले होते, त्यांनी त्यांच्या अडचणी मला बोलून दाखवल्या. सगळ्याच अडचणी कॅमेऱ्यासमोर सांगायच्या नसतात. माझ्या त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेत.”
भाजपला लगावला टोला: पुढे बोलताना सुळे यांनी नगरच्या (अहमदनगर) राजकारणाचा दाखला देत भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ घोषणेची खिल्ली उडवली. त्या म्हणाल्या, “भाजप नेते काँग्रेसमुक्त भारताची भाषा करतात, पण नगरच्या राजकारणाकडे पाहिले तर एका राम शिंदे यांना सोडले तर सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते भाजपमध्ये गेले आहेत. मग भाजपची स्वतःची मूळ विचारधारा उरली आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
शरद पवार आणि मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत झाली नाही – प्राजक्त तनपुरे
दरम्यान, भाजप प्रवेशापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील खंत आणि भूमिकेविषयी स्पष्टीकरण दिले. ते प्रांजळपणे कबूल करत म्हणाले की,
भेटीची हिंमत नव्हती: “मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. पण हा निर्णय घेत असताना माझे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब किंवा माझे मामा जयंत पाटील यांना सामोरे जाण्याची, त्यांना सांगण्याची किंवा त्यांची भेट घेण्याची माझ्यात हिंमत नव्हती.”
निर्णयाचे कारण: “मतदारसंघातील सध्याच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी आजवर राजकीय संघर्ष केला, त्यांच्या भावना आणि त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करणे मला गरजेचे होते.”









