---Advertisement---
नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी परिसरातील अम्मा दर्गाहमध्ये एक गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. अम्मा दर्गाहचे संचालक, त्यांचा मुलगा आणि अन्य सहकाऱ्यांसह एकूण सहा जणांविरुद्ध लैंगिक शोषण, हत्येचा प्रयत्न आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील एक तरुणी धार्मिक कार्यक्रमासाठी नागपुरातील जुनी कामठी येथील अम्मा दर्गाह परिसरात आली होती. याच दरम्यान संबंधित आरोपींनी तिच्यावर विविध प्रकारचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडीतिचे लैंगिक शोषण करण्यात आले तसेच जीव घेण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत काही गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, तिला एका खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच विशिष्ट धार्मिक प्रथा स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. आरोपींकडून धमक्या देण्यात आल्या आणि स्वतःच्या जीवाला धोका असल्याची भीती निर्माण करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या घटनांनंतर संबंधित तरुणीने तेथून सुटका करून पश्चिम बंगाल गाठले. तेथे उपचार घेतल्यानंतर तिने स्थानिक पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनंतर हे प्रकरण नागपूर जिल्ह्यातील कन्हान आणि कामठी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ताजी तनविरूद्दीन, ताजी मुस्तफीउद्दीन आणि तेजस खोबरागडे या तिघांना अटक केली. एफआयआरमध्ये बाबा ताजी जनवेखान, ताजी मुस्तफाखान बेग, बशारा फातिमा ताजी आणि मल्ला धुर्वे यांच्यासह इतरांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व आरोपांची सखोल पडताळणी केली जात आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









