भुसावळ घरफोडी प्रकरणातील तीन आंतरराज्यीय आरोपी अटकेत; नागपूरमध्ये संयुक्त कारवाई, गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त….

---Advertisement---

 

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाली असून, स्थानिक गुन्हे शाखा (जळगाव) आणि नागपूर शहर पोलिसांच्या घरफोडीविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करून तीन आंतरराज्यीय आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली. तपासात आरोपी भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातील बालाजी लॉज आणि आसपासच्या भागात वास्तव्यास असल्याचे समोर आले.

पुढील तांत्रिक तपासात आरोपींचे लोकेशन नागपूरमधील गणेशपेठ परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर नागपूरच्या घरफोडीविरोधी पथकाने तातडीने कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजेश पारस शहा (५२, बिहार), भोला उर्फ बिरेंदर सुखदेव पासवान (४०, बिहार) आणि जसपालसिंग राजू (४२, हरियाणा) यांचा समावेश आहे.

झडतीदरम्यान आरोपींकडून भुसावळमधील घरफोडीशी संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी करत असून, या टोळीच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक केदार बारबोले आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---