---Advertisement---
यावल नगरपरिषदेत करण्यात आलेल्या खुर्ची खरेदीवरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या गटनेत्या नंदाताई महाजन यांनी नगरपालिकेच्या सभागृहासह विविध विभागांसाठी खरेदी करण्यात आलेल्या खुर्च्यांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी नगरपरिषद कार्यालयात भेट देत नंदाताई महाजन यांनी कक्ष अधीक्षक विशाल काळे यांच्याकडून खुर्ची खरेदीची माहिती घेतली. यावेळी ३९ खुर्च्यांच्या खरेदीवर सुमारे ९ लाख ३६ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली. या आकडेवारीनुसार एका खुर्चीची किंमत सुमारे २४ हजार रुपये होत असल्याचा दावा करत त्यांनी या खरेदीत अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला.
महाजन यांनी यापूर्वीच कार्यालयात वापरात असलेल्या खुर्च्या उपलब्ध असताना नवीन खुर्च्या इतक्या मोठ्या खर्चातून खरेदी करण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच खरेदी प्रक्रिया कोणाच्या मान्यतेने राबविण्यात आली, किती निविदा प्राप्त झाल्या आणि अंतिम निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नगरपालिकेतील वाढत्या कथित गैरव्यवहारांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधित व्यवहारात काही अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना कक्ष अधीक्षक विशाल काळे यांनी खुर्ची खरेदीची संपूर्ण प्रक्रिया निविदा पद्धतीने आणि शासनाच्या नियमांनुसार झाल्याचे सांगितले. या व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झालेला नसून मागविण्यात आलेली माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
नगरपालिका प्रशासनाने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या गटनेत्या वर्षा चोपडे यांनी मागितलेल्या माहितीलाही प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले आहे. खुर्ची खरेदी प्रकरणात कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी विरोधी पक्षाच्या आरोपांमुळे हा विषय शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
आता या प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येते आणि चौकशीची मागणी कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









