---Advertisement---
जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात एका १५ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेट तिच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचाराच्या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आरोपीने तिच्या राहत्या घरातून तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर जैनाबाद येथील आरोपीने पीडितेला स्वतःच्या राहत्या घरात डांबून ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान हा संपूर्ण प्रकार जळगाव येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसमोर पीडित मुलीने दिलेल्या जबाबानंतर उघडकीस आला. यानंतर पीडितेच्या ३४ वर्षीय आईने जळगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार ४ जून २०२६ रोजी दुपारी नराधम आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
घटनेची गांभीर्यता लक्षात घेत जळगाव शहर पोलिसांनी फिर्याद दाखल होताच तपासचक्र फिरवून संशयित आरोपी कृष्णा चंद्रभान तायडे (रा. जैनाबाद, जळगाव) याला ४ जून २०२६ रोजी सायंकाळी अटक केली आहे. या नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत आहेत. मात्र जळगाव शहरात वारंवार अशा घडत असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.









