भुसावळातील वांजोळा चौफुली बनली मृत्यूचा सापळा; एकाच महिन्यात १० अपघात, तीन वर्षांत 47 जणांचा अपघाती मृत्यू….!

---Advertisement---

 

भुसावळ शहरालगत मुंबई नागपुर महामार्गावर असलेली वांजोळा चौफुली सध्या अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून या परिसरातील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत वांजोळा चौफुलीवर तब्बल 10 अपघात झाल्याची माहिती समोर आली असून मागील तीन वर्षांत या परिसरात 47 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वांजोळा चौफुलीला आता ‘मृत्यूचा सापळा’ अशी ओळख मिळत असल्याचे चित्र आहे.

दीपनगर ते नशिराबाद मार्गावरील हा वांजोळा चौक भुसावळ परिसरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू मानला जातो. शहरातून तसेच मुंबई नागपुर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने या मार्गाने यावे ये-जा करतात. या ठिकाणी दिवस-रात्र सुरू असलेली वाहतुकीची वर्दळ, अवजड वाहनांची मोठी संख्या आणि वाहनचालकांकडून होणारी निष्काळजीपणा यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.

तर गेल्या काही वर्षांपासून या चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेकदा दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादचारी यांना याचा फटका बसला आहे. काही अपघातांमध्ये गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या चौकाला राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठिकाण म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आहे.

भुसावळ शहरातील स्थानिकांच्या मते, वांजोळा चौफुलीवरील वाहतुकीचे नियोजन, वाहनांचा वेग, चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक आणि नियमांचे पालन न होणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. विशेषतः महामार्गावरून येणारी अवजड वाहने वेगात असल्यामुळे छोट्या वाहनांना धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असला तरी कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे या चौकात अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

वाहतूक विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र अपघातांची वाढती संख्या पाहता केवळ आवाहनांपेक्षा ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वांजोळा चौफुलीवरील वाढत्या दुर्घटनांमुळे आता प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---