शहाद्यात भरवस्तीत धाडसी घरफोडी; दोन घरे फोडून चोरट्यांचा धुमाकूळ, चांदीचे दागिने लंपास…!

---Advertisement---

 

शहादा शहरातील प्रकाशा रोडवरील मिरा नगर भागात अज्ञात चोरट्यांनी दोन घरे लक्ष्य करत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्यांनी एका घरातून १७ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले असून, दुसऱ्या घरातील चोरीचा तपशील मालक परगावी असल्याने अद्याप समोर आलेला नाही. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरा नगर येथील रहिवासी आणि व्यवसायाने क्लार्क असलेले फिर्यादी दीपक झुलाल कोळी (वय ३५) हे ११ जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे झोपले होते. ११ जूनच्या रात्री १० ते १२ जूनच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कपाटात ठेवलेले एकूण १७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. यात चोरट्याने ८ हजार रुपये किमतीची १० भार वजनाची हातातील चांदीची पाटली, ४ हजार रुपये किमतीचे ५ भार वजनाचे पायातील चांदीचे वाळे, ३ हजार रुपये किमतीचे ४ भार वजनाचे पायातील चांदीचे जोळवे आणि २ हजार ५०० रुपये किमतीची ३ भार वजनाची बाळाच्या हातातील चांदीची पाटली असा मुद्देमाल चोरून नेला.

चोरट्यांनी दीपक कोळी यांच्या घरासोबतच त्यांचे शेजारी पुनाराम भैराराम चौधरी (वय ५५) यांचेही घर फोडले. मात्र, चौधरी सध्या आपल्या गावी राजस्थान येथे गेले असल्याने त्यांच्या घरातून नेमका काय आणि कितीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे, हे ते परत आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेबाबत दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(a), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  चंद्रशेखर देसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---